आयुष्यभर काँग्रेस विचारांचा झेंडा अभिमानाने खांद्यावर मिरवणारे प्रणव मुखर्जी साहेबांना रा.स्व.संघाने दोन वर्षांपूर्वी कार्यक्रमासाठी नागपूरला आंमंत्रित केले. हा कार्यक्रम देशभर गाजला. प्रणबदांनी आयुष्यभर संघाच्या विचारांना कडवा विरोध केला. मग आता ते संघाच्याच व्यासपीठावर जावून काय बोलणार , याची उत्सुकता सर्वांना होती. प्रणबदा धोरणी, मुत्सद्दी, विचारी व मुरलेले राजकारणी होते. संघाच्या विचारांचं संघाच्याच कार्यक्रमात असं कांही वाभाडं काढलं की संघ स्वयंसेवकांना तोंड दाखवायला जागा राहीली नाही. या कार्यक्रमात प्रणबदा काय बोलले त्याची दै. दिव्य मराठीच्या पहिल्या पानावर आलेली बातमी जशी च्या तशी.....सोबत कार्यक्रमाचा फोटो. 


नागपूर - अनेक संस्कृतींचा संगम, त्यांची एकरूपता आणि सहअस्तिव हीच आमची खरी राष्ट्रीय ओळख आहे. सांस्कृतिक, धार्मिक विश्वास आणि भाषांमधील बहुविविधता ही तर भारताची विशेष ओळख आहे. सहिष्णुतेतून आम्हाला शक्ती मिळते. आम्ही बहुवाद मान्य करून त्याचा आदर करतो. त्यामुळे गैरसमज, धर्म आणि क्षेत्राची ओळख, द्वेष आणि असहिष्णुतेच्या आधारे राष्ट्रीयतेची व्याख्या करून आम्ही आमची राष्ट्रीयतेची खरी ओळखच गमावून बसण्याची शक्यता आहे, या शब्दांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून संघाला कानपिचक्या दिल्या. त्याच वेळी लोकशाहीत सर्व महत्त्वाच्या विषयांवर, किचकट समस्यांवर संवाद होणे आवश्यक असून त्यातूनच  अशा समस्यांचे समाधान शोधू शकतो, असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी आपल्या स्वपक्षालाही दिला.


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारण्यावरून वादळ उठले.त्या पार्श्वभूमीवर संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जी काय संदेश देतात याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे मुखर्जी यांनी आपल्या भाषणात सौहार्द, सहअस्तित्व व बहुविविधतेवर भर देतानाच संवाद प्रक्रियेवरही भर दिला.राष्ट्रीयतेची व्याख्या मांडताना मुखर्जी यांनी माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथातील दाखले दिले.


 


देशातील हिंदू, मुस्लिम, शीख आणि अन्य समूहांच्या आदर्श संयोगातूनच खरी राष्ट्रीयता प्रवाहित होऊ शकते. मात्र, त्यामुळे एखादी संस्कृती विलुप्त होईल असा याचा अर्थ नाही, या शब्दात मुखर्जी यांनी संघाचे कान टोचले.  गांधीजींनीही राष्ट्रीयता ही विध्वसंक नव्हे तर सर्वसमावेश असावी, असे मत व्यक्त केले होते याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले.


आर्थिक क्षेत्रात आमच्या देशाने मोठी प्रगती केली. तथापि, आनंदाच्या निर्देशांकात (हॅपीनेस इंडेक्स) १५६ देशांमध्ये आमचे स्थान १३३ वे आहे, असा अलिकडचा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट सांगतो. लोकांच्या आनंदातच राजाचाही आनंद असतो. लोकांचे कल्याण हे त्याचेही असते. त्यामुळे त्याने लोकांच्याच कल्याणात आपला आनंद मानला पाहिजे, असा सल्लाही मुखर्जी यांनी यावेळी दिला.

कुठल्याही सरकारच्या दृष्टीने या देशातील सर्वसामान्य जनताच केंद्रस्थानी असली पाहिजे. त्यामुळे लोकांमध्ये विभाजन करून त्यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याची कुठलीही कृती होता कामा नये. गरिबी, आजार आणि अन्य चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध विरुद्ध लढण्याची शक्ती लोकांना प्रदान करण्याची सरकाराची भूमिका असली पाहिजे,  असे परखड मत  मुखर्जी यांनी व्यक्त केले.  


शांतता, सौहार्द आणि आनंद हेच आमच्या सार्वजनिक धोरणाचे खरे घटक असावे आणि असले पाहिजेत. त्यातूनच आम्हाला आनंदी देशाची निर्मिती शक्य होणार असून राष्ट्रीयता त्यातून आपोआपच बहरू लागेल, असे मतही मुखर्जी यांनी व्यक्त केले. ---- हनुमंत पवार (उसमनाबाद)

Post a Comment

कुठल्याही प्रकारच्या स्पॅम लिंक किंवा अश्लील भाषा वापरू नये .

Previous Post Next Post